मराठी भाषा गौरव दिन – सेंट इझाबेल्स् हायस्कूल
दि. २६ फेब्रुवारी रोजी सेंट इझाबेल्स् हायस्कूलमध्ये मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीम. शालिनी शिंदे मॅडम यांनी स्वीकारले. कार्यक्रमास अतिथी म्हणून प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीम. जॅनेट जॉर्ज मॅडम तसेच माध्यमिक विभागाच्या पर्यवेक्षिका श्रीम. लिडीया बरेटो मॅडम या उपस्थित होत्या.
कार्यक्रमाच्या प्रारंभी अतिथींचे स्वागत मराठी विभागाच्या सहाय्यक शिक्षिका श्रीम. संध्या कुटे तसेच जेष्ठ शिक्षिका श्रीम. अविना डिसुझा यांनी केले. श्रीम. आयेशा मुकादम व श्रीम. संगिता डिमेलो यांच्या हस्ते कार्यक्रमास लाभलेल्या अतिथींस पुष्पगुच्छ देण्यात आले.
मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. मराठी अभिमान गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर लेझीम, भारूड, जात्यावरच्या ओव्या, वारकरी नृत्य, तारपा नृत्य, मंगळागौर, बडबड गीत, समूहगान, कोळी नृत्य, पोवाडा तसेच बाल्या नृत्य अशा विविध पारंपरिक व लोककलेच्या सादरीकरणांत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. या सर्व कार्यक्रमांतून मराठी संस्कृतीची समृद्ध परंपरा आणि वैभव प्रकट झाले.
हा कार्यक्रम मराठी विभागामार्फत आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीम. विद्या मांडवे यांनी प्रभावीपणे केले. प्रास्ताविक श्रीम. स्नेहा पाटील यांनी केले, तर कार्यक्रमाच्या शेवटी श्रीम. मृणाल लुगडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
या कार्यक्रमास सेंट इझाबेल्स् हायस्कूलचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षकवृंद तसेच शिक्षकेतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते. एकूण २२५ विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात उत्साहाने सहभाग घेतला. सहभागी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्यामुळे हा कार्यक्रम अत्यंत यशस्वीरीत्या पार पडला. मराठी भाषेप्रती अभिमान व जिव्हाळा निर्माण करण्याच्या दृष्टीने हा कार्यक्रम निश्चितच प्रेरणादायी ठरला.
